मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य करणारा अध्यादेश काढल्यानंतर विजयोत्सव साजरा करत मराठा आंदोलक स्वगृही परतले. परंतु, त्यानंतरही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राज ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा मोर्चेकरी विजयोत्सव साजरा करत माघारी फिरले. परंतु, त्यांना नेमका कसला विजय मिळाला, हे लोकांना कळले पाहीजे. मोर्चेकरी मराठा बांधवांना नेमका कसला निर्णय झाला हे कळलं का? तसेच तुम्ही विजयी झालात तर मग तुमच्यावर परत उपोषण करण्याची वेळ का आली?”
राज ठाकरे म्हणाले, या आंदोलनाला आतून-बाहेरून कोणाचा पाठिंबा आहे ते सर्वांना माहिती आहे. केवळ ती गोष्ट उघड बोलता येत नाही. राज ठाकरे यांच्या या टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. मनोज जरांगे म्हणाले, हे सगळे राजकीय डाव आहेत. काही जण राजकीय सुपाऱ्या घेतल्यासारखे बोलतात. मुळात आरक्षण ठेवलेलं असतं का? कोणीतरी गेलं आणि लगेच मिळालं असं काही असतं का? हवं तर राज ठाकरे यांनी माझ्या जागी यावं, मराठ्यांचं नेतृत्व करावं. एका दिवसात आम्हाला आरक्षण मिळवून द्यावं. आम्ही तुमच्या मागे उभे राहतो.
मुंबईत जाऊन मराठा समाजाला काय मिळाले आणि काय नाही मिळाले हे एखाद्या घटना तज्ञाला विचारून घ्या. काही जण सरकारची सुपारी घेऊन बोलत आहेत. जे मिळाले तो गोर गरिबाला मिळाले. तुम्हाला काहीही मिळाले नाही म्हणून पोटात दुखते. तुम्हाला पद, पैसा हवा होता तो मिळाला नाही.गर्दी आणि समीकरण यामुळे देखील मुंबईत अनेकांच्या पोटात दुखू लागले. आधी मराठे यांच्या पाठिशी उभे होते तेव्हा त्यांना ते चांगले वाटत असे. आता मराठे हे मराठ्यांसाठी उभे राहिलेत. त्यामुळे समीकरण बदलले आहे.