छगन भुजबळ यांचं करिअर उद्ध्वस्त करू. त्यांनी आमच्या वाटेला जाऊ नये, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून दिला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांचा हा इशारा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी उडवून लावला आहे. मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आमदारकीचं काय घेऊन बसलाय?, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचा इशारा उडवून लावला आहे. मराठ्यांवर अन्याय करा असं आम्ही म्हटलं नाही. त्यांना सेपरेट आरक्षण द्या असं सांगितलं. सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना सर्वाधिक सुविधा आहेत. आमचा त्याला विरोध नाही. आणखी काय पाहिजे? घरेही सरकार देत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहे. कर्ज माफीच्या योजना आणत आहोत. विद्यार्थ्यांची फी देत आहोत. शहरात शिकणाऱ्यांना वसतिगृह देणं, वसतिगृहाची सुविधा देता येत नसेल तर 60 हजार रुपये देणं या गोष्टी सरकार सर्वांसाठी करत आहे. मग अडचण काय आहे?, असा सवाल भुजबळ यांनी केला.