लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेल्या फटक्याचं खापर अजितदादांच्या राष्ट्रवादीवर फोडले जात असून, महायुतीत अजितदादांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे त्यांनी आता प्रकाश आंबेडकरांसोबत जावं असे विधान अजित पवारांचे विश्वासू आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे. हे आपलं वैयक्तिक मत असलं तरी पक्षानं यावर विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मिटकरी यांनी वरील विधान केले आहे.
अजितदादांना महायुतीत एकटं पाडण्याचा प्रयत्न होत असून, काहीही करून त्यांनी महायुती सोडावी यासाठी दोन्ही मित्र पक्षातील काही लोक प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोपही मिटकरी यांनी केला आहे. अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावे यासाठी काहीजण मानसिक खच्चीकरण करण्याचाही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही नेते महाराष्ट्राचं राजकारण बदलवून शकतील असा विश्वासह मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केला आहे.