Saturday, October 5, 2024

राज्यात किती टक्के पाऊस पडणार, शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी?, हवामान खात्याने दिली महत्वाची अपडेट

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांची आनंदाची बातमी आहे. येत्या १० दिवसात राज्यात मान्सूनचे आगमन होईल. अशामध्ये राज्यामध्ये यंदा मान्सूनमध्ये किती टक्के पाऊस पडणार याबाबत हवामान खात्याने महत्वाची अपडेट दिली आहे. यावर्षी मान्सूनमध्ये महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. रामचंद्र साबळे यांनी आज राज्यातील पावसाचा अंदाज काय असणार आहे? हे सांगण्यासाठी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांनी ही महत्वाची माहिती सांगितली.

महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनमध्ये सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे वाढते तापमान आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. शेत पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ते पावसाची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने मान्सून कधी येणार याची अपडेट दिली होती. केरळमध्ये यंदा मान्सून लवकरच दाखल झाला. त्यामुळे महाराष्ट्रात देखील पावसाचे आगमन लवकर होणार आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना रामचंद्र साबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सुर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारीत आहे. वाऱ्याचा वेग, सूर्य प्रकाशाचा कालावधी आणि तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाडी, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड रहाण्याची शक्यता आहे.

तसंच, दापोली, नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव आणि परभणी येथे खंडाचा कालावधी कमी रहाण्याची शक्यता आहे. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील आणि कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असेल अशाप्रकारचे हवामान राहणार असल्याचा अंदाज यावेळी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला.

राज्यात यंदा पश्चिम विदर्भात ९८ टक्के, मध्य विदर्भात ९८ टक्के, पूर्व विदर्भात १०३ टक्के, मराठवाडा विभागात ९७ टक्के, कोकण विभागात १०६ टक्के, उत्तर महाराष्ट्रामध्ये ९८ टक्के आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ९७ टक्के पाऊस पडण्याची शक्यता रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.

त्याचसोबत रामचंद्र साबळे यांन शेतकऱ्यांना देखील आवाहन कले आहे. यंदा मान्सूनमध्ये मोठे खंड पडणार असल्याची शक्यता असून शेती हा व्यवसाय आता दिवसेंदिवस हवामानाच्या अनुषंगाने प्रभावित होत आहे. जिथं जास्त पाऊस झाला आहे तिथंच शेतकऱ्यांनी पेरणी केली पाहिजे. जिथं कमी पाऊस झाला आहे तिथं पेरणी करू नये. तसेच पीक घेताना देखील काळजी घेतली पाहिजे.’ असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles