नागपूर : सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. यातच पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्तीसुद्धा दिली जाते. मात्र, ती केवळ २०० विद्यार्थ्यांना दिली जाते. ही संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली. यावर, राज्यात होत असलेल्या पीएचडींपैकी खरंच किती पीएचडींची आपल्याला गरज आहे? संख्या वाढवून काय करणार? पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असं धक्कादायक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभागृहात केल्याने विरोधकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे पी.एचडी करणाऱ्या उमेदवारांकडून अजित पवार यांच्या वक्तव्याचा धिक्कार केला जातोय.
पीएचडीचा त्या व्यक्तीला वैयक्तिक, राज्याला तसेच समाजाला किती उपयोग होतो आहे याचा अभ्यास करण्यात आला. आजकाल कोणत्याही विषयांवर पीएचडी केली जातेय. त्यानुसार २०० चा आकडा निश्चित करण्यात आला, असे पवारांनी सांगितले.
यावर काही जण तर नेत्यांवरच पीएचडी करण्यात व्यस्त आहेत, असा टोला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. यावर पवार म्हणाले, ‘त्यापेक्षा तरुण हुशार विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे. यंदा संस्थेतर्फे सुविधा देण्यात आलेल्यांपैकी १७ जण युपीएससी परीक्षेत विविध सेवांसाठी उत्तीर्ण झालेत, अशी माहिती पवारांनी दिली. तसेच संस्थेतर्फे विविध शहरांमध्ये वसतीगृह व अभ्यासिका उभारल्या जात आहेत. त्यासाठी ११९७ कोटी रुपयांची तरतूदही झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.