राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. निवडणूक आयोग ६ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी घेईल. तत्पूर्वी शरद पवार गट अजित पवारांचं निवडणूक आयोगाबद्दलचं एक वक्तव्य (व्हिडीओ) निवडणूक आयोगाकडे देणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या त्या वक्तव्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो, असं बोललं जात आहे.
अजित पवार तेव्हा म्हणाले होते की, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडणूक आयोगाने म्हटलं आहे की ४० आमदार आणि काही खासदार हे एका बाजूला गेले म्हणून आम्ही पक्ष आणि चिन्ह तिकडे (शिंदे गट) दिलं. मग एखाद्या पक्षाचा एक आमदार किंवा दोन आमदार असतील. हे एक-दोन आमदार दुसऱ्या बाजूला गेले तर काय होईल? मनसेचं उदाहाण घ्या. मनसेचा एक आमदार आहे. उद्या तो आमदार म्हणाला, मनसे माझी, इंजिन माझं (पक्षाचं चिन्ह) आणि पक्षही माझा, तर तेव्हादेखील तुम्ही तसाच निर्णय देणार का?