राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची नावं फायनल झाली आहेत. महायुतीचं ठरल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांना गृह खात्याऐवजी नगरविकास आणि आणखी एखादे महत्वपूर्ण खाते दिले जाणार आहे. उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत २० हुन अधिक मंत्री देखील शपथ घेणआर आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली.शपथविधीसाठी ३६ तासांचा अवधी उरला असताना शिवसेनेत मंत्री पदासाठी लॉबिंग सुरू आहे. शिवसेनेच्या निवडक ज्येष्ठ मंत्र्यांना उद्या मुंबईत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महत्वाच्या खात्यांसाठी शिवसेनेत लॉबिंग सुरू आहे. नाराजी टाळण्यासाठी मंत्र्यांपासून खात्यांबाबत गुप्तता ठेवली जात आहे. शिवसेनेतून ७ आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. माजी मंत्र्यांच्या यादीतून ३ मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. अकार्यक्षम, भ्रष्टाचाराचे आरोप आणि वाचाळविर माजी मंत्र्याना शिंदेंकडून नारळ दिला जाणार आहे.