गुजरातमधील गांधीनगरमध्ये पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनी ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील असं म्हटलं. अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच हे विधान केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावर आक्षेप घेत थेट अंबानींवर निशाणा साधला आहे. रिलायन्स ही गुजरातील कंपनी होती, आहे आणि राहील असं विधान मुकेश अंबानी यांनी केलं आहे, असं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना संदीप देशपांडेंनी मुकेश अंबानींवर निशाणा साधताना गुजरातला परत जाण्याचा सल्ला दिला. “आम्हाला आतापर्यंत वाटत होतं की रिलायन्स भारतीय कंपनी आहे. मात्र काल त्यांनी स्पष्ट केलं की ही गुजराती कंपनी आहे. त्यांनी असंही स्पष्ट केलं की माझी कर्मभूमी गुजरात आहे. मग तुम्ही महाराष्ट्रात आलात कशाला? आमच्या मराठी माणासाने इथं तुमची कंपनी उभारण्यासाठी जमीनी दिल्या. तुम्हाला वाटत असेल ही गुजरातची कंपनी आहे तर सगळा बाऱ्याबिस्तारा गुंडाळा, तुमचा अँटेलिया गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा. तुमचं महाराष्ट्रात काम काय आहे?” असा सवाल देशपांडे यांनी विचारला.
“मराठी माणसाने यापुढे रिलायन्सचं कुठलंही प्रोडक्ट घेताना विचार केला पाहिजे की आपण भारतीय कंपनीकडून प्रोडक्ट विकत घेत नसून गुजराती कंपनीकडून प्रोडक्ट विकत घेत आहोत. यांचा उद्देश जर फक्त गुजरातचा विकास करण्याचा असेल तर तुम्ही महाराष्ट्रात काय करताय? हा आमचा प्रश्न आहे,” असंही देशपांडे म्हणाले.