मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांवर आगपाखड केली. आरक्षण मिळाल्यावर गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी होतील, ते मोठे अधिकारी होतील, अशी भीती सगळ्यांना वाटते. त्यामुळे मी आरक्षणाच्या बाजूने उभं राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरले आहे. मी एकटा पडलो आहे. सत्ताधारी पक्षातील मराठे नेते माझ्या बाजूने बोलत नाही, त्यांनी मला उघडं पाडलं आहे. विरोधी पक्षातील खासदारही माझ्या बाजूने बोलत नाहीत. पण मराठा समाजाने एकजूट राहावे, ही माझी विनंती आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
मराठा समाजाच्या नेत्यांनी फक्त निवडू येण्यापेक्षा किंवा आपल्या पदाची चिंता करण्यापेक्षा जातीचे आरक्षण महत्त्वाचे आहे, ही गोष्ट लक्षात घ्यावी. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी ही गोष्ट सिद्ध करुन दाखवली आहे. ओबीसी नेत्यांसाठी निवडणुकीपेक्षा जातीचे आरक्षण महत्त्वाचे आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
त्यामुळे मराठा जात संकटात सापडली आहे. मराठा समाजाला आवाहन आहे की, ६ ते १३ जुलैपर्यंत होणार्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहा. आपल्या डोळ्यांदेखत लेकरांचे वाटोळे होऊन देऊ नका. ६ तारखेपर्यंत मराठ्यांनी आपली सर्व कामे उरकून घ्यावीत. ६ जुलैला एकाही मराठ्याने घरात न राहता शांतता जनजागृती रॅलीला उपस्थित राहावे.
प्रत्येक जिल्ह्यातील जनजागृती रॅलीला ताकदीने प्रतिसाद द्या. आपल्याला घेरलं गेलंय, आपली जात संकटात सापडली आहे. मी एकटा पडलोय, पण मी मागे हटत नाही. मी मेलो तरी हरकत नाही, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देईन, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.