विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात १० जानेवारी, अर्थात उद्या अंतिम निकाल देणार आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात सूचक विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच बाजूने निकाल लागण्याची अपेक्षा आहे. “विरोधकांकडे आरोप करण्याशिवाय दुसरा मुद्दा नाही. अध्यक्षांकडे सुनावणी झाली, त्याचा निकाल आता लागेल. पण मी एवढंच सांगतो, लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेतही बहुमत आहे, लोकसभेतही बहुमत आहे. निवडणूक आयोगानंही अधिकृत शिवसेना पक्ष व चिन्ह आम्हाला दिलं आहे. त्यामुळे मला वाटतं मेरिटप्रमाणे निकाल मिळायला हवा”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“आम्ही कोणत्याही प्रकारे नियम सोडून काम केलेलं नाही. हे सरकार नियमाने स्थापन झालेलं आहे. त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. मला खात्री आहे की मेरिटप्रमाणे निकाल लागेल”, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.