“महाराष्ट्रातील अस्वस्थेमुळे माय-बाप जनतेचं नुकसान होत आहे. २०० आमदारांचं सरकार आहे. पण, स्थिरपणा देत नाही. याने राज्याच्या विकासाचं नुकसान होत आहे. दिल्लीतून पाहते, तेव्हा महाराष्ट्राचा विकास दीड वर्षात थांबल्याचं दिसते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. हा राजकीय नाहीतर सामाजिक विषय होऊ शकतो,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं . पुण्यात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “२०० आमदारांचा पाठिंबा असणारे सरकार स्थिर नाही, असं कसं म्हणू शकतो?”
आमदारांच्या सुनावणी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत, याबाबत प्रतिनिधींनी प्रश्न केल्यावर अजित पवारांनी म्हटलं, “प्रत्येकाचं वेगवेगळं काम सुरू आहे. सरकार आपलं काम करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकासाला महत्व देतात. पण, प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुणी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाकडे गेलं आहे. ही एक वेगळी प्रक्रिया आहे.”