राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात ओबीसींच्या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. ओबीसींच्या आकडेवारीवरून दोघांमध्ये बैठकीतच खडाजंगी झाली. छगन भुजबळ यांनी मांडलेली अशी कोणतीही आकडेवारी खरी नाही. तशी आकडेवारी असेल तर दाखवून द्यावी, असं थेट आव्हान अजित पवारांनी भुजबळांना दिलं.
आरक्षणासंदर्भात ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी नेत्यांची सरकारसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. छगन भुजबळ यांनी बैठकीत मंत्रालयात काम करणाऱ्या ओबीसी समाजाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आकडेवारी मांडली. ओबीसींवर अन्याय होतोय. ओबीसी समाजाचे कमी अधिकारी मंत्रालयात आहेत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीवर अजित पवार यांनी आक्षेप घेतला. ही माहिती साफ चुकीची आहे. ही माहिती खरी असेल तर भुजबळांनी याबाबतचे पुरावे दाखवावे, असं अजित पवार बैठकीत म्हणाले. यानंतर पुन्हा दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे बैठकीत काही क्षणासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं बघायला मिळालं. टिव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने सदर वृत्त दिले आहे.