लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला. याची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून अजित पवार सतर्क झाले आहेत. त्यांनी नव्याने पक्ष उभारणीचे काम हाती घेतले असून कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरु केली आहे. मात्र, पक्ष उभारताना अजित पवार यांनी महायुतीतील घटक असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेलाच मोठा धक्का दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नितीन पाटील यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. नितीन पाटील पाटील हे कन्नडचे माजी आमदार आहेत.
तसेच ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक देखील आहेत. कन्नड विधानसभा मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे. शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे विश्वासू नेते म्हणून नितीन पाटील यांची ओळख आहे. मात्र, आज त्यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे.
दरम्यान, नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार (NCP Ajit Pawar) यांची ताकद वाढली आहे. दुसरीकडे एका दिग्गज नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेना शिंदे गटाचे काही नेते तसेच पदाधिकारी नाराज झाल्याचं कळतंय. नितीन पाटील यांना अजित पवार गटाकडून विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.