महायुतीत अजित पवार यांना एकटे पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचवेळी विधान परिषद निवडणुकीत भाजपने अजित पवार यांना झटका दिला आहे. अजित पवार यांच्या पक्षाऐवजी शिवसेनेच्या उमेदवारास भाजपने पाठिंबा दिला आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात महेंद्र भावसार हे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत. तर किशोर दराडे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. भाजपने मात्र शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा आहे. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांना शिक्षक मतदार संघात प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यांनी शिंदेंच्या सेनेचे उमेदवार किशोर दराडे हेच महायुतीचे उमेदवार असा उल्लेख केला. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत एकटे पाडले जात असल्याची चर्चा रंगली आहे.