विधानसभा निवडणुकांचं वातावरण तापू लागलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांमध्येही मोठ्या घडामोडी घडतायेत. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेते मोठा दावा केला आहे. कर्जत जामखेडमधून माझ्या विरोधात अजित पवार उभे राहू शकतात असा दावा केला आहे. काही कंपनी सर्व्हे केले जात आहेत, त्यात जय पवार, पार्थ पवार यांची नावं असल्याची माहिती आहे, मात्र जनता माझ्या बरोबर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
बारामती पवार कटुंबीयांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र पक्षफूटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट महायुतीत सामील झाला आणि बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना उमदेवारी देण्यात आली. सुप्रीया सुळे या मतदारसंघातून विद्यमान खासदार होत्या. त्यामुळे नंणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला होता. त्यामुळे राज्यासह देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. सुप्रीया सुळे या पुन्हा विजयी झाल्या.
या मतदारसंघात पवार कुटुंबीय एकमेकांविरुद्ध ठाकल्यामुळे पवार विरुद्ध पवार असं समीकरण सुरू झालं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार निवडणुकीच्या चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार गटाकडून ते निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
कर्जत जामखेडमधून माझ्या विरोधात अजित पवार उभे राहू शकतात असा दावा रोहित पवारांनी केला आहे. काही कंपनी सर्व्हे केले जात आहेत, त्यात जय पवार, पार्थ पवार यांची नावं असल्याची माहिती आहे, मात्र जनता माझ्या बरोबर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे बारामतीनंतर आता कर्जत जामखेडमध्येही पवार विरुद्ध पवार सामना रंगणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पहावं लागणार आहे.