भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माफी मागितली आहे. “मी रामदास आठवले यांची माफी मागतो”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
बावनकुळे म्हणाले , “महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या शपथविधीचा कार्यक्रम हा १४ डिसेंबर रोजी होणार होता. पण आमचे आमदार आधीच नागपूरला गेले होते. त्यामुळे शपथविधीचं स्थळ अचानक बदललं गेलं. या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी मी सर्व पक्षांना पत्राच्या माध्यमातून निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, मी स्वत: जाऊन रामदास आठवले यांना निमंत्रण द्यायला पाहिजे होतं, ते देऊ शकलो नाही. त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. रामदास आठवले यांची मी माफी देखील मागितली आहे. रामदास आठवले यांचं आमच्या महायुतीतं मोठं स्थान आहे. त्यांची जी कोणती मागणी असेल त्याबाबत आमचं केंद्रातील नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग्य निर्णय घेतील. आम्ही त्यांचा आदर करतो”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.