मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावरुन घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर, आता महायुतीतील नेत्यांमध्ये वादावादी सुरु झाली आहे. छगन भुजबळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावं, अशी आक्रमक भूमिका उत्पादन शुल्क मंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी घेतली. सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध करत, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसींनी रस्त्यावर उतरुन विरोध करावा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं होतं. पुढच्या दाराने आरक्षण मिळत नाही, त्यामुळे ओबीसीमधून आरक्षण म्हणजे मागच्या दारातून वाट मिळवण्याचा प्रयत्न आहे. तसंच मनोज जरांगे यांना न्यायाधीश जाऊन भेटतात त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही असंही भुजबळ म्हणाले होते. त्याला शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं.
शंभूराज देसाई म्हणाले, “काल आमचे सहकारी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असे आश्चर्यकारक वक्तव्य केले. ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे हे मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट झाले आहे. अचानक भुजबळ यांनी असे वक्तव्य केले त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे”