शिंदे गटाच्या शिवसंकल्प अभियानानिमित्त मंत्री उदय सामंत मंगळवारी कोल्हापूरात होते. यावेळी माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सामंतांना डिवचण्यासाठी शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा केला होता. या सातही खासदारांनी तशाप्रकारचं लेखी दिल्याचेही सतेज पाटलांनी खळबळजनक दावा केला होता.
सतेज पाटलांच्या या दाव्यावर उदय सामंत यांनी देखील एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. माझ्या अंदाजाप्रमाणे 8 ते 9 काँग्रेस नेते हे देखील कमळावर लढायला तयार आहेत. याची अधिकृत यादी माझ्याकडे आहे. ही नावे लवकरच जाहीर करेन,असे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच जसे सतेज पाटलांनी सांगितले त्यांच्याकडे यादी आहे, तशी माझ्याकडे देखील आहे. कोण कुठे भाजपच्या लोकाना जाऊन भेटले? कोण कुठे मुख्यमंत्र्यांना भेटले? याची इत्यभूत माहिती देखील माझ्याकडे असल्याचे उदय सामंत यांनी न्युज 18 लोकमतला सांगितले.