लोकसभेची निवडणूक संपताच शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी (ता. १४) हा प्रवेश सोहळा पार पडलाय. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंदडा यांचे स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जयप्रकाश मुंदडा हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून सलग ४ वेळा निवडून आले होते. ते माजी सहकार राज्यमंत्री देखील होते. त्यांची हिंगोलीत मोठी ताकद आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंदडा हे नाराज होते. आपल्याला पक्षात डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीतही पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझं ऐकून न घेतल्याचं मुंडदा म्हणाले. इतकंच नाही, तर शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) यांनी देखील आपल्याला विश्वासात घेतलं नाही. तसेच परस्पर उमेदवार जाहीर केला, अशी नाराजी मुंदडा यांनी बोलून दाखवली.