अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वीच बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटानेच चक्रव्यूह रचल्याची चर्चा असून अजितदादा या चक्रव्यूहात पुरते अडकल्याचे सांगितले जात आहे. ‘दैनिक लोकसत्ता’ने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे.
या वृत्तानुसार महायुतीमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी जोरदार चढाओढ सुरु आहे. तिन्ही पक्ष आपापल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत 160 जागा लढवण्याचा चंग बांधल्याने शिंदे गट आणि अजितदादा गटापैकी एकाला जागावाटपात नमते घ्यावे लागणार, हे स्पष्ट आहे. तसे न झाल्यास महायुतीत बाका प्रसंग उद्भवू शकतो. यादृष्टीने आता भाजप आणि शिंदे गटाने जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास आपल्याला अधिकाअधिक जागा लढवता येतील, अशी रणनीती आखल्याची माहिती ‘दैनिक लोकसत्ता’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाच्या विरोधात वापरलेली भाषा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रुचली नव्हती. याविरोधात दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करु, असा इशाराही अजितदादा गटाने दिला होता. मात्र, ‘अजित पवार यांना जिथे कुठे तक्रार करायची असेल तिथे करु द्या’ असे म्हणत नितेश राणे यांनी आपल्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा असल्याचे दाखवून दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणे यांच्या हिंदुत्त्ववादी विचारसरणीचे समर्थन केले होते. त्यामुळे नितेश राणेंबाबतच्या अजित पवार यांच्या तक्रारीला भाजप फारशी किंमत देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.