लोकसभेत एनडीए’ने बहुमत मिळवले असून सरकार स्थापन केले. आता राज्यात विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातील सर्व पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे, महायुतीमधील पक्ष विधानसभा एकत्र निवडणुका लढवणार असून महाविकास आघाडीतील पक्षही एकत्र लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, काही दिवसापासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी जागावाटपावरुन विधाने करण्यास सुरूवात केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीमध्ये अजित पवार गटाला ८० जागांची मागणी केली आहे. आता जागावाटपावरुन महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी विधानसभेच्या जागावाटपावरुन भाष्य केलं आहे.
विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चेवर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “महायुतीतील प्रमुख नेत्यांनी जागावाटपाबाबत जाहीर मेळाव्यात बोलणं हे हिताच नाही हे समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार आहे, महायुतीतील वरिष्ठ नेत्यांची ज्यावेळी बैठक होईल त्या बैठकीत हा विषय चर्चेत आला पाहिजे आणि त्याची सोडवणूक तिथेच केली पाहिजे. अशा जाहीरपणे मागण्या करुन त्यामध्ये वितुष्ठ महायुतीत निर्माण होतं. हे याक्षणी पोषक नाही, जर भुजबळ साहेब ८० जागा मागायला लागले, शिंदे साहेब ८०,९० जागा मागतील मग १०५ आमदार आणि अपक्ष असे ११४ आमदार असणाऱ्या आम्ही २२८ जागा मागायच्या का? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी केला.