केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेलेल्या टीकेला शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेवरील खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले, “गद्दारांना सोबत घेऊन तुम्ही सरकार बनवलं आणि तुम्ही दगाफटक्याच्या गोष्टी करताय. गद्दारी व बेईमानीला या देशात कोणी खतपाणी घातलं असेल तर ते भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलं आहे. अमित शाह यांनी देखील गद्दारीला खातपाणी घालण्याचं काम केलं आहे आणि तेच अमित शाह या स्वाभिमानी महाराष्ट्रात येऊन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. शरद पवारांवर टीका करतात, उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणतात.हा बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. ज्यांच्या नावावर तुम्ही स्वतःचं पोट भरताय, त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात येऊन बोलणं आणि त्यावर टाळ्या वाजवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
विधानसभा निवडणुकीत कष्ट घेतलेल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून महायुतीला मतदान करणाऱ्या मतदारांचे शहा यांनी जाहीर आभार मानले. भाजपचे प्रदेश अधिवेशन रविवारी शिर्डीत झाले. त्याच्या समारोप्रसंगी गृहमंत्री शहा बोलत होते. शहा म्हणाले, ‘महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केले आहे. या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मोठे काम केले आहे. त्यांनी महायुतीला मिळवून दिलेल्या विजयाचे अनेक अर्थ आहेत. शरद पवारांनी सुरू केलेले येथील दगाफटक्याचे जुने राजकारण आणि अलीकडे उद्धव ठाकरे यांचे द्रोहाचे राजकारण नाकारून जनतेने त्यांना घरी बसविले. पूर्वी राज्यात चालत आलेले अस्थिरता आणि जातीयवादाचे राजकारण मोडीत काढून, जनतेने खरी शिवसेना आणि ‘राष्ट्रवादी’ कोणाची हेही दाखवून दिले आहे.






