अजित पवारांनी पक्ष सोडल्यानंतर तेथील अनेक नेते त्यांची जागा घेण्यासाठी उतावळे झालेले आहेत. ते आता पक्ष सोडला म्हणून टीका करत आहेत. मात्र, गेल्या निवडणुकीत तेच भाजपच्या तिकिटावर आमदारकीचे स्वप्न पाहत होते. तसेच सरकारमध्ये स्थान दिले नाही म्हणून राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट करत कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी आमदार रोहित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे रायगडमधील कर्जत येथे गुरुवारी वैचारिक मंथन शिबिर पार पडले. या वेळी धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आणि रोहित पवारांवर निशाणा साधला.
मुंडे म्हणाले, ‘त्या पक्षात काही जण एवढे उतावळे झाले आहेत, की त्यांना दादांची जागा घेतल्याचा भास होऊ लागला आहे. आता त्यांच्याही काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूक एकत्रित राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याएेवजी हडपसरमधून भाजपच्या उमेदवारीसाठी कुठल्या खासदाराकडून प्रयत्न सुरू होते.