उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगितले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा ठोकलेल्या जागांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे नुकतेच मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अमित शाह यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते. तसेच शाहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठीही गेले होते. तत्पूर्वी रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते.