मागील काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यात संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर चर्चेला आणखी जोर आला होता. याबाबत एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रसारमाध्यमांकडे सध्या दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे भुजबळांच्या बातम्या दाखवल्या जात आहेत, असेही भुजबळ म्हणाले.
विधानसभेआधी अथवा नंतर मी कुठेही जाणार नाही. मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. कायमच राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिल, असे छगन भुजबळ म्हणाले.
राजकारणात नाराज होऊन चालत नाही. राजकारणात प्रत्येकजण नाराज होतो अन् दुसऱ्या दिवशी कामला लागतो. कमी जागा मिळाल्यामुळे राहुल गांधी नाराज असतील, मोदीसाहेबही नाराज असतील. शरद पवारही नाराज असतील.. देवेंद्र फडणवीसही नाराज असतील.. अजित पवारही बारामतीची जागा का गेली, त्यामुळे नाराज असतील. ज्याप्रमाणे नाराजीनंतर सर्व नेते कामाला लागले, तसेच मीही कामला लागलोय. मी नाराज नाही. किंवा कुणालाही भेटलो नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.