राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी जरांगेंबाबत केलेल्या विधानाबाबत मराठा समाजाने निषेध व्यक्त केला आहे. आमदार बबन शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या पंढरपुरात झालेल्या सभेचा खर्च केल्याचं वक्तव्य केले होते. जरांगे यांनी एकट्याने समाजाचा ठेका घेतला आहे का” असे वक्तव्यही त्यांनी केले होते. या वक्तव्याचा निषेध म्हणून मराठा समाजाच्या महिला झोळी धरून निधी जमा करीत आहे.
आज (रविवारी) इसबावी येथील आंदोलनात आमदार शिंदे यांचे पैसे देण्यासाठी महिलांनी झोळी धरली. समाजातील बांधवांनी 1 रुपया ते 5 रुपयांचे दान टाकून आमदार शिंदे यांचे पैसे देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांचे पुत्र रणजीत शिंदे यांच्या फोन पे नंबरवर सुद्धा 1 ते 5 रुपये पाठवून त्यांचा निषेध करण्यात आला. “जो लोकप्रतिनिधी मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतील त्यांना समाज धडा शिकवेल,” असा इशारा मराठा समाजाने दिला आहे.