महायुतीची बैठक टाळून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी गावी निघून गेल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचा निकाल लागून आठ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला आहे. निकालाबाबत लोकांच्या मनात संशय आहे. आता किती दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत. एकनाथ शिंदे नाराज होऊन अमावस्येच्या दिवशी आपल्या गावाला निघून गेले. त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, पण ते कधी होणार? याची महाराष्ट्र वाट बघत आहे. एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यांचे मानसिक आणि शारीरिक संतुलन चांगले नाही. त्यांचा चेहरा पडलेला आहे. डोळ्यात चमक दिसत नाही. ते स्वतः म्हणताय मी सगळ्यांचा लाडका भाऊ आहे. वेगळा निर्णय ते घेणार नाहीत, त्याला हिंमत लागते, अशी टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली.