राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे, मुंबई उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र रुपाली चाकणकर यांच्या नावाला पक्षातून विरोध दर्शवला असून एकाच महिलेला किती पदे? असा सवाल उपस्थित करत रुपाली ठोंबरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत अजित पवार यांना भेटणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे मा.अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे,बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा इतर महिलांना समान संधी द्यावी, ही विनंती असेल,” असे रुपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे.
“राज्यपाल नियुक्त आमदाराबाबत जे नावं चर्चेत आहेत, त्या बातम्या पेरण्यात आलेले आहेत. रुपाली चाकणकर यांच्याकडे आधीच महिला आयोगाचे अध्यक्ष पद आणि महिला प्रदेशाध्यक्ष अशी दोन पद आहे. एक व्यक्ती आणि एक पद असा निकष असला पाहिजे, मी पण अजितदादाची लाडकी बहीण आहे, त्यामुळे मी पण विधान परिषदेसाठी इच्छुक आहे. रुपाली चाकणकर यांचे नाव. निश्चित झाल्यास त्याला आमचा विरोध असणार आहे. याबाबत मी अजितदादाशी प्रत्यक्ष भेटून बोलणार आहे,” असेही त्या म्हणाल्यात.