विधानसभेचे वारे वाहू लागल्यापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीमधील अनेक बडे नेते विधानसभेच्या निवडणुकांआधी तुतारी हाती घेण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. अशातच अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नगरमधील भाजप नेते विवेक कोल्हे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून आज ते पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये शरद पवार भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. नगरमधील कोपरगाव विधानसभेच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र भाजप नेते विवेक कोल्हे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आज पुण्यामध्ये विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या गव्हर्निंग कौन्सिलची पुण्यातील मांजरी येथे बैठक पार पडत आहे. या बैठकीदरम्यान विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाया पडत शरद पवार यांचे आशिर्वाद घेतले. या भेटीनंतर आता पुन्हा एकदा विवेक कोल्हे हे शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.