अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षण संचालनालयासमोर धरणे अंदोलन….
प्रलंबित प्रश्नांबाबत अखिल शिक्षक संघ आक्रमक
अहमदनगर : राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनियमित होणारे दरमहाचे वेतन तसेच इतर वेतनेतर अनुदानाच्या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने राज्याध्यक्ष देविदास बस्वदे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण संचालनालय , पुणे येथे एक दिवशीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले असल्याची माहिती राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे ,राज्य संघटक राजेंद्र निमसे व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी दिली .
दिवाळी सणापासून शिक्षकांचे मासिक वेतन दोन-दोन महिने उशिरा होत आहे.पगाराविना दिवाळी साजरी करण्याची वेळ राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर आल्याने शिक्षकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.गेल्या दोन -तीन वर्षापासून वैद्यकीय बीले व इतर बाबीचे प्रतिपूर्ती साठी अनुदानमिळत नाही ,शालेय पोषण आहार योजनेत मुख्याध्यापकांना पदरमोड करुन चालवावी लागत आहे ,सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता शिक्षकांना मिळालेला नाही यासह अनेक प्रश्न प्रलंबित असून शासन -प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे.
यावेळी बोलतांना राज्याध्यक्ष देविदास बस्वदे म्हणाले की,या निद्रिस्त प्रशासनाला जागं करण्यासाठी शिक्षक संघाकडून धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करुन प्रशासनाने मार्ग काढावा अन्यथा हा लढा आणखी तीव्र केला जाईल असा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने दिला आहे .यावेळी विविध जिल्ह्यातील उपस्थित पदाधिकारी यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
प्रशासनाच्या वतीने शिक्षण संचालक कार्यालयाचे प्रशासन अधिकारी विशाल पवार व कार्यालयीन अधिक्षक संतोष जैन यांनी आंदोलन कर्त्यांचीची भेट घेवून निवेदन स्वीकारले . तसेच शिक्षण संचालक ( प्राथमिक )मा शरद गोसावी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.तसेच लवकरच शिक्षण संचालक (प्राथमिक ) यांच्या समवेत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांच्या समवेत शिक्षण संचालनालय पुणे येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन स्थळी येवून शिक्षकांच्या आदोलनास पाठिंबा दर्शवला तसेच मी स्वतः शिक्षकांच्या मागण्याबाबत शासन -प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी बोलतांना सांगितले.
या धरणे आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातून राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे , राज्यसंघटक राजेंद्र निमसे , संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम ,जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे , जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रणदिवे , अखिल पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद , अखिल मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष महादेव चोभे ,श्रीगोंदा तालुका ऐक्य मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग झरेकर ,नगर तालुका कार्याध्यक्ष संजय कांबळे ,अखिल नेवासा पदवीधर संघाचे अध्यक्ष सर्जेराव ससाणे आदी उपस्थित होते .