राज्यभरात गणपती विसर्जनाचा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. मुंबई, पुणे, कोल्हापूरसह प्रमुख शहरांमधील गणपती विसर्जन अद्याप सुरु आहे. अशातच गणरायाने निरोप घेतल्यानंतर आता राज्यामध्ये पावसाचे दमदार आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अनेक भागांमध्ये पुन्हा पावसाची बॅटिंग पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला वर्तवला आहे. गणपती विसर्जनाच्या सोहळ्यानंतर राज्यात काही भागांमध्ये पाऊस पुन्हा हजेरी लावेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सप्टेंबरच्या शेवटपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज होण्याची शक्यता आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात पाऊस कोसळणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे.