डिसेंबर महिन्यातही अवकाळी पावसाची हजेरी कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं लवकरच चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या तापमानावर परिणाम होणार आहे. राज्यात अवकाळी पावसाचं थैमान सुरुच असल्याने बळीराजा मात्र संकटात सापडला आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि वेस्टर्न डिस्टर्बनसमुळे राज्यात पुढील 24 तासांत काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आयएमडी (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.