मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल नागपूरमध्ये पार पडला. यानंतर भाजप, शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये अन् त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय भाजपचे मित्र पक्षांमध्ये देखील नाराजीचं वातावरण आहे. विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. नांगरणीसाठी जी बैल वापरली गेली ती बैल बाजूला करुन ठेवली असल्याची खंत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. मित्रपक्षांना तिन्ही पक्षांनी सामावून घेणं गरजेचं होतं. तीन पक्षांनी मित्रपक्षांसाठी काही मंत्रिपदं बाजूला काढून ठेवायला हवी होती. परंतु, दुर्दैवानं तसं झालं नाही.गावगाड्यामध्ये पैरा केला जातो, त्याप्रमाणं दुर्दैवानं काही झालं की आम्ही तीन पक्षांचं शेत नागंरुन दिलं. मात्र, आमचं शेत नांगरायची वेळ आली तेव्हा बैलासकट गडी घेऊन गेले. आम्ही मात्र शेतात उभे आहोत. मात्र, प्रामाणिकपणे महायुतीसोबत उभे आहोत, असं सदाभाऊ खोत म्हणाले. सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना भाजपनं विधानपरिषदेवर संधी दिली होती.