‘या निवडणुकीत तुतारीसमोरचं बटण दाबा. काल कुणीतरी सांगितलं कसं दाबा म्हणून पण मी काही तसं सांगत नाही. त्यांनी सांगताना हेही सांगितलं की असं दाबलं तर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आता हे कमी पडू देणार नाही त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. कारण, काही देणंघेणं देऊन मतं मागण्याची आमची भूमिका नाही. इथं काम करायचं. लोकांना ताकद द्यायची. लोकांची सेवा करायची आणि मत मागायचं ही भूमिका आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक प्रत्युत्तर दिलं.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी कन्हेरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती. येथूनच शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात केली. या सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. तसेच अजित पवार यांच्यावरही खोचक टीका केली.