Saturday, May 18, 2024

राज्यातील ३ जिल्ह्यांना रेड अलर्ट, मुसळधार पावसासह गारपिट…

राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस , गारपीट यामुळे शेतपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा संकटात आला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने अवकाळी पावसासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळकर यांनी यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘विदर्भातील अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.’

त्याचसोबत, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढचे चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये अशीच परिस्थिती राहणार असल्याचे देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. अशामध्ये शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांना मंगळवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेत पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव, अकोला, नांदेड, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांतील अनेक गावांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. या पावसामुळे आंबा, संत्रा, लिंबू, टरबुज, हळद, गहू आणि भाजीपाला यांचे मोठे नुकसान झाले. त्याचसोबत अनेक भागांमध्ये पावसामुळे घरांची पडझ़ड झाली आहे. या पावसामुळे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles