‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. आता नव्या वर्षात त्याचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची पहिली झलक प्रसादने नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
प्रसाद खांडेकर दिग्दर्शित या नव्या चित्रपटात एक-दोन नव्हे तर तब्बल १८ मराठी कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाची पहिली झलक शेअर करत दिग्दर्शक लिहितो, “नवीन वर्षाची सुरुवात कशी असावी तर अशी असावी…हा व्हिडीओ बनवण्याचं कारण म्हणजे, नुकतंच २०२४ हे वर्ष सुरू झालंय आणि आम्ही तुमच्या भेटीला लवकरच एक नवीन सिनेमा घेऊन येत आहोत.”
प्रसाद खांडेकरांच्या या नव्या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. यामध्ये प्रसाद खांडेकरसह स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव, वनिता खरात, रोहित माने, ओंकार राऊत, निखिल रत्नपारखी, प्रियदर्शनी इंदलकर, सचिन गोस्वामी, चेतना भट, प्रभाकर मोरे, ऐश्वर्या बदाडे, श्याम राजपूत, निखिल बने, प्रमोद बनसोडे, श्लोक खांडेकर हे कलाकार झळकणार आहेत.