Wednesday, January 22, 2025

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला; भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येणार?

मुंबई: महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचा तिढा जवळपास सुटला आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत महायुती सरकारमध्ये कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं येणार, याचा फैसला झाला आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच 14 डिसेंबरला राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, यावरही जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महायुती सरकारमध्ये भाजपच्या वाट्याला 20, शिवसेना 12 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रि‍पदे मिळू शकतात. त्यामुळे आता याबाबत अंतिम घोषणा कधी होणार, हे पाहावे लागेल. मात्र, आता खातेवाटप कसे होणार, याची अधिक उत्सुकता सर्वांना लागली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृह, महसूल आणि नगरविकास खात्याची मागणी केली होती. मात्र, ही महत्त्वाची खाती भाजप एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडणार का, हे पाहावे लागेल. याशिवाय, अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याचा कारभार दिला जाणार का, हेदेखील बघावे लागेल. मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये काय प्रतिक्रिया उमटतात, हेदेखील पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

देवेंद्र फडणवीस हे बुधवारी दिल्लीला गेले होते. काल रात्री अमित शाह यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि जे.पी. नड्डा या तिघांची बैठक झाली. ही बैठक रात्री उशीरा संपली. अमित शाह, जे.पी. नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तब्बल दीड तास मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाबाबत खलबतं सुरु होती. या तिन्ही नेत्यांनी भाजपच्या कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात घ्यायचे, याबाबतही चर्चा केल्याचे समजते. याशिवाय, महाराष्ट्र भाजपच्या संघटनात्मक गोष्टींबाबतही तिन्ही नेत्यांकडून काही निर्णय घेण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे बैठक उशीरा संपल्याने रात्री दिल्लीतच थांबले. आता गुरुवारी ते पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊ शकतात. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या यादीवर शिक्कामोर्तब होईल, असे सांगितले जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles