अहमदनगर-राष्ट्रीयग्राम स्वराज अभियानातंर्गत नगर तालुक्यातील कोल्हेवाडी च्या सरपंच मनीषा कुटे यांची त्रिपुरा राज्य येथे अभ्यास दौऱ्यासाठी जिल्हा परिषद अहमदनगर याच्या वतीने निवड करण्यात आली होती. अभ्यास दौरा यशदा, पुणे यांच्या नियंत्रणा खाली करण्यात आला.
कोल्हेवाडी ला ‘आदर्श गाव ‘ पुरस्कार मिळविण्यात सरपंच मनिषा कुटे यांनी गावात केलेली विकासात्मक कामे अन् स्वच्छतेसाठी केलेली अपार मेहनत महत्वाची ठरली. गावात १९ बचत गट असून सर्व बचत गटातील महिलांना एकाच छताखाली आणण्यासाठी त्यांनी गावातच महिलांसाठी कार्यालय उभे केले. विकासाबरोबरच स्वच्छता, महिलांचे संघटन या कामाची दखल जिल्हा परिषदेने घेत त्यांची त्रिपुराच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली.
त्रिपुराच्या अभ्यास दौऱ्यात भरपूर शिकण्यास मिळाले. याबद्दल जिल्हापरिषद अहमदनगर व राज्य शासनाला धन्यवाद देत असल्याचे सरपंच कुटे यांनी म्हटले. अभ्यास दौऱ्यात विशेषतः बचतगटाची चळवळ, मुलींसाठी पिंक टॉयलेट स्कीम, सामान्य जनजीवन, शेती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद यांचा कारभार अनुभवता आला. तेथील सीईओ, बीडीओ, ग्रामप्रधान आणि सचिव यांच्याशी बोलताना विविध विकास व शासनाच्या योजना विषयी माहिती भेटली. त्रिपुरा येथील लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिकांनी अतिशय आदरपूर्वक आमचा सन्मान केला असल्याचे सरपंच मनिषा कुटे यांनी सांगितले.
त्रिपुराच्या अभ्यास दौऱ्यासाठी सरपंच कुटे यांना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, उपसरपंच पोपट शेळके, दादासाहेब जाधव, भीमराज कांबळे, संगीता कुटे, लिला बनकर, नंदा कराळे, ग्रामसेवक बाजीराव पवार यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.