उल्हासनगर येथे झालेल्या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले आहेत. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीबाबत अपडेट समोर आली आहे. राहुल यांची प्रकृती स्थिर आहे.राहुल पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर महेश गायकवाड अजूनही ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर आज देखील उपचार सुरू राहणार आहेत. प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत.
शुक्रवारी (२ फेब्रुवारी) रोजी उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. आपल्या मुलाला मारहाण केली म्हणून मी हा गोळीबार केला असं आमदार गायकवाड यांनी म्हटलं आहे.
उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उल्हासनगरमधील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.