वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या हल्ल्याप्रकरणी मंगेश साबळे यांच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर मंगेश साबळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वीही मराठा आंदोलनाच्यावेळी ते चर्चेत आले होते. साबळे हे संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच आहेत. अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. यावेळी पोलीस आणि आंदोलकांची बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्यावेळी मंगेश साबळे यांनी फुलंब्रीत भर रस्त्यात आपली कार पेटवून देत अंतरवली सराटीतील मारहाण प्रकरणाचा निषेध नोंदवला होता. फुलंब्री पंचायत समितीसमोर पैसे उधळत मंगेश साबळे यांनी आंदोलन केलं होतं. विहिरीसाठी बीडीओ पैसे मागत असल्यामुळे त्यांनी नोटा उधळत आंदोलन केलं होतं. तब्बल दोन लाख रुपयांच्या नोटा उधळत मंगेश यांनी आंदोलन केलं होतं.
मंगेश साबळे हा मराठा क्रांती मोर्चातील गुणवंत आणि क्रियाशील कार्यकर्ता आहे. मंगेश साबळे यांच्या पाठीशी आम्ही खंबीर पणे उभे राहू, असं मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितलं.