मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने लातूरमध्ये पती- पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे. लातूरच्या अहमदपूरमध्ये पती- पत्नीने विषारी द्रव्य प्राशन केले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये ज्ञानोबा तीडोळे आणि त्यांची पत्नी चंचलाबाई तीडोळे या दोघांनी विषारी द्रव्य प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांनी सहा वेळा उपोषण केले. मात्र उपोषण करूनही सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. तसेच मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. मराठा आरक्षण मिळावे यासाठी राज्यात अनेकांनी आत्महत्या झाल्या आहेत. यानंतर पती- पत्नीने हा टोकाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.
उपोषणाची दखल घेतली जात नसल्याच्या नैराश्यातून तीडोळे पती- पत्नीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दरम्यान सदर प्रकार लक्षात आल्यानंतर दोघांनाही लागलीच शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.