जालना : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचं हत्यार उपसलं असून 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असं त्यांनी जाहीर केलं. मनोज जरांगे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकाही केली. अंतरवाली सराटी येथे त्यांनी हा निर्णय जाहीर केला. मात्र मनोज जरांगे यांच्या या निर्णयाला उपस्थित आंदोलकांनी विरोध केला असून जरांगे यांनी निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केल्याचं दिसून आलं.
ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनी 29 ऑगस्ट 2023 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मधून आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने मनोज जरांगे यांनी गोदापट्ट्यातील 123 गावांच्या आंदोलक समन्वयकांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं.
मनोज जरांगे यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. देवेंद्र फडणवीसांचे 113 आमदार पाडणार असं जरांगे म्हणाले. भाजपमधील सगळे मिळून फडणवीसांचा काटा काढणार, त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत असं त्यांचे लोक आपल्याजवळ येऊन बोलतात असं जरांगेंनी म्हटलंय.
फडणवीसांचे लोक आपल्याला रात्री येऊन भेटतात असा दावा मनोज जरांगे यांनी केला. भुजबळांपेक्षाही अधिक जातीयवाद हा फडणवीसांनी पसरवला अशी टीका मनोज जरांगेंनी केली.