सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्या पासून अनेक नवनिर्वाचित खासदार, नेते त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवत आहेत. अशातच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काल रात्री दुसऱ्यांदा जरांगे यांची भेट घेतली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडचे नवनिर्वाचित खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बजरंग सोनवणे यांनी रात्री उशिरा अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी खासदार सोनवणे यांनी जरांगे पाटील यांच्या तब्बेतीची विचारपूस केली तसेच यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी तब्बल दोन तास चर्चा केली.
तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्रातील सगळ्या खासदारांना एकत्र करून राज्यपालांना भेटणार असल्याचेही बजरंग सोनवणे यांनी यावेळी सांगितले. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या जीआर काढून पुर्ण कराव्यात, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.