मालवणमधील छत्रपती शिवरायांचं पुतळा कोसळल्यानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या घटनेनंतर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी देखील झाली आहे. त्यानंतरही या प्रकरणावरून एकमेकांवर टीका केली जात आहे. आता या प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतली आहे. ‘नेत्यांनी राजकारण बंद करा अन्यथा जनतेला तुमच्या विरोधात उठाव करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मालवणमधील प्रकरणावरून राजकीय नेत्यांना खडेबोल सुनावले. मालवण पुतळा प्रकरणावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘या प्रकरणामुळे देशातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. एवढ्या मोठ्या स्मारकांबाबत दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी कोणीही राजकारण करू नका. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वापर राजकारणासाठी करू नये. शेवटी हे राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राजकारण करायला नेत्यांना खूप जागा आहेत. याप्रकरणी राजकारण करू नका’.
‘सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या प्रकरणी राजकारण करू नये. याप्रकरणी कोणी दोषी असेल तर त्याला कायमचं आतमध्ये टाकलं पाहिजे. राजकारण बंद करा अन्यथा जनतेला तुमच्या विरोधात उठाव करावा लागेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.