जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणारवरून सत्ताधाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्यासाठी जीव जाळतोय, आम्हाला आरक्षण दिलं नाही तर कुणालाही सोडणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
आज जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. मराठा आरक्षणाच्या मागणीवर भाष्य करताना जरांगे पाटील म्हणाले, ‘आमची लेकरे मोठी झाली पाहिजे. यासाठी आम्ही जीवाची बाजी लावतोय. आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठीच आम्ही जाीव जाळतोय. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर कुणालाही सोडणार नाही. मी एवढा विरोध मराठ्यांसाठी करत आहे. आम्हाला दुसरे काही अपेक्षित नाही’.
खासदार कल्याण काळे यांच्या भेटीवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ‘ते कशासाठी आले होते, मला माहीत नाही. काँग्रेसने मराठ्यांची मते घेतली, निवडून आले. तर आमच्या विरोधात वडेट्टीवार बोलतात. त्याबद्दल मी काळे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. उपोषणाच्या काळात मागण्या पूर्ण करा. त्यानंतर आमचा रोष परवडणारा नाही’.