राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन रान पेटले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जरांगे पाटलांच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरूवात होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील पहिल्या सभेने या दौऱ्याला सुरूवात होईल.
मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौऱ्याला आजपासून सुरूवात होत आहे. जरांगे पाटील हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांची पहिली सभा धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरातील जगदाळे मामा हायस्कूल च्या मैदानावर सकाळी ११.३० होईल.
तसेच दुपारी २ वाजता भुम तालुक्यातील ईट या गावात जरांगे पाटील सभा घेणार आहेत. दुपारी ४.३० वाजता परंडा शहरातील पंचायत समितीच्या पाठीमागील मैदानावर भव्य सभेत ते मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी केली आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालण्यातील अंतरवालीत आमरण उपोषण छेडल होतं. मात्र सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांनी हे उपोषण मागे घेत २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे.