उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य केलं. मनोज जरांगे यांच्या सभेला कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नागरिकही का जातात? असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. त्यांच्या याच वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी अजित पावर यांच्यावर निशाणा साधलाय. “अजित पवार यांनी आमच्यात फूट पडायचं ठरवलं आहे काय? आम्ही भाऊ-भाऊ आहोत आणि आम्ही येणारच. तुमची जी भावना आहे ती त्यांची नाही. त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांना आरक्षण भेटावं, तुम्ही याच्यासाठी बाहेर पडले काय? एवढे दिवस तर मराठा आंदोलनावर बोलले नाही”, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी सुनावलं.
तुम्हाला सरकारने यासाठी पुढे घातलं आहे काय? आम्ही भाऊ-भाऊ आहोत. आमच्यातील एकी तुम्हाला बघवत नाही का? तुम्हाला यायचं नाही आणि आता मिठाचे खडे टाकता का? आमच्या तोंडात घास येत असताना त्यामध्ये माती कालवता का? तुम्हाला कोणी बंधनं घातली का येऊ नका म्हणून? लोक येऊन पाठबळ देत आहेत आणि गरीब मराठ्यांचे कल्याण होईल, तर तुमचं पोट का दुखत आहे?”, असे तिखट प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना उद्देशून उपस्थित केले आहेत.