लोकसभा २०२४ निवडणुकीपूर्वी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून कायद्यात रुपांतर करा. तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्या. अन्यथा, कोट्यवधी मराठ्यांची भावनिक लाट येणार आणि निवडणुकीत तुमचा सुपडा साफ करणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. ते हिंगोलीत बोलत होते.
राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के स्वतंत्र आरक्षण हे फसवं असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे.
मराठा समाजाला मिळालेलं १० टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही. त्यामुळे सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. यासाठी त्यांनी पुन्हा एकदा राज्यभरात संवाद यात्रा सुरू केली आहे.
सोमवारी (ता. ११) मनोज जरांगे पाटील यांनी परभणी दौरा केला. यानंतर रात्री ते हिंगोलीत दाखल झाले. यावेळी येळेगाव येथील मराठा बांधवांनी जरांगे यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना जरांगेंनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला.