मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा लढवण्याबाबतचा 29 ऑगस्टला होणारा निर्णय आता पुढे ढकललाय. विधानसभेच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे जरांगेंनी आपली रणनीती बदलल्याचं बोललं जातंय. मात्र जरागेंनी नेमकं कशामुळे घोषणा लांबणीवर टाकली? नेमकं काही बिनसलं की जरांगेंची यामागे गुप्त रणनीती आहे, यावरचा हा रिपोर्ट.
सरकारने आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करणारे मनोज जरांगेंनी अचानक आपली रणनीती बदललीय. विधानसभेत 288 पाडायचे की नाही यावर 29 ऑगस्टला बैठकीत मनोज जरांगे मोठी घोषणा करणार होते..मात्र सरकारनं निवडणूका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढं ढकलावी लागली असं म्हणत जरांगेंनी सरकारवर खापर फोडलंय.
महाराष्ट्रातील पाऊस आणि सणांमुळे निवडणुका दिवाळीनंतर घेणार असल्याचं निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी म्हटलं होतं. एकीकडे सरकारनं नुकतीच लाडकी बहीण योजना जाहीर केलीये. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावून डिसेंबरमध्ये निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच जरांगेंनी एक पाऊल मागे येत 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलली आहे.
त्यामुळे जेव्हा निवडणुकीची तारीख जाहीर होईल तेंव्हा बैठक घेऊ असं म्हणत जरांगेंनी आपला प्लान पुढे ढकललाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होतेय. त्यामुळे निवडणुका कधीही झाल्या तरी जरांगेंचं आव्हान सरकार समोर असणार एवढं नक्की.