‘मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवारच आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतील भूमिका जाहीर करावी. त्यांना आमचा जाहीर पाठिंबा राहील.’ असे वक्तव्य मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी केले आहे. मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यांनी राज्यातील सर्वच मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशामध्ये ते या निवडणुकीमध्ये सर्व मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवार असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी केला आहे. शरद पवार ५० ते ६० वर्षांपासून राजकारणात असून मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याचे देखील यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी उद्या अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याबाबत निर्णय घेणार आहे.
अशातच ‘जर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व पक्षांच्या विरोधात आपले उमेदवार उभे केले आणि जे जे आरक्षणाच्या विरोधात आहे त्यांच्याबाबत भूमिका जाहीर केली तर मराठा ठोक मोर्चाच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देऊ. मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी जे रान उठवले होते. याचा फायदा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला झाला आहे. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीमधील एकही खासदार मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करत नसल्याने आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करावी आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू.’ अशी भूमिका रमेश केरे पाटील यांनी स्पष्ट केली.